---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (दि. १५ मार्च २०२६) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, चाळीसगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण गावठी कट्टे हाताळत होते. यावेळी आरोपी अंकित महेंद्र मोरे, मेहुल रत्नपाल मोरे, कृष्णा जिभाऊ झेल्टे (सर्व रा. चाळीसगाव) तसेच इतर दोन अनोळखी इसम उपस्थित होते. त्याचदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने हातातील गावठी कट्टा फिर्यादीच्या दिशेने रोखून ट्रिगर दाबल्याने गोळी सुटली आणि ती सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यामध्ये लागली.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी सिकंदर शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके रवाना केली असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी आणि त्यांचे पथक या गुन्ह्याचा बारकाईने तपास करत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.









