---Advertisement---
देशासह महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस सिलेंडर टंचाईमुळे अखेर ग्राहकांचा संताप अनावर झाला. बुधवारी शेंदुर्णीत नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर रस्त्यावरच सिलेंडर आडवे ठेवत रास्ता रोको आंदोलन छेडले.
गॅस सिलेंडर मिळण्यासाठी एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागत असल्याने गृहिणींना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्राहकांनी मुख्य रस्त्यावर आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
बुधवार हा शेंदुर्णीचा साप्ताहिक बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलकांनी काही वेळानंतर शांततेत आंदोलन मागे घेतले. तरीही, गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेंदुर्णी हे तालुका दर्जाचे मोठे गाव असून येथे ग्राहकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, येथे इंडेन गॅसची एकच एजन्सी असल्यामुळे ताण वाढला आहे. भारत गॅस आणि एचपी गॅसच्या एजन्सी नसल्याने इतर ठिकाणांहून पुरवठा केला जातो.
एजन्सीचे संचालक अजय राखेचा यांनी सांगितले की, वरूनच गॅस पुरवठा कमी होत असल्याने सर्व ग्राहकांना वेळेवर सिलेंडर देणे शक्य होत नाही. पुरवठा जसजसा येईल तसतसे वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संवेदनशील प्रश्नावर प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.









