---Advertisement---
जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले सोन्या-चांदीचे दर आज अचानक वाढल्याने ग्राहकांसह गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल 7 हजार 500 रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरातही 20 हजार रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
आज जळगाव सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे:
सोन्याचे दर (GST विना) – 1 लाख 60 हजार रुपये
सोन्याचे दर (GST सह) – 1 लाख 64 हजार 800 रुपये
चांदीचे दर (GST विना) – 2 लाख 90 हजार रुपये
चांदीचे दर (GST सह) – 2 लाख 98 हजार 700 रुपये
सोनं चांदीच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा आर्थिक फटका बसला असला, तरी गुंतवणूकदारांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.
सोने चांदीच्या दरवाढीमागची कारणे काय?
जळगाव सुवर्णनगरतील सराफा व्यावसायिकांच्या मते, जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलर-रुपया विनिमय दरातील चढ-उतार आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे वाढलेला कल या सर्व कारणांमुळे जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत तसेच जळगावच्या स्थानिक सराफा बाजारावर झाल्याचे व्यावसायिक सांगतात. मात्र अलीकडच्या काळात शेअर बाजारातील चढ-उतार, महागाईचा दबाव आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे नागरिक सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा सोनं आणि चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे. यामुळे येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील काळातील दरांचा विचार जर केला तर जळगाव सुवर्णनगरीतील सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार – पुढील काळात सोन्याचे दर अडीच लाख रुपयांपर्यंत तर चांदीचे दर तब्बल सात लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्यांनी आधीच गुंतवणूक केली आहे त्यांना फायदा होण्याची शक्यता असून, नव्या खरेदीदारांनी दरांचा विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला व्यावसायिक देत आहेत.
मात्र बाजारात काहीश्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत, दरवाढीमुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी असली, तरी गुंतवणूकदार मात्र आनंदी आहेत. येत्या काही दिवसांत दर आणखी वाढतात की स्थिर राहतात, याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे









