एलपीजी काळाबाजार रोखण्यासाठी सरकार अ‍ॅक्शनमध्ये;२५०० ठिकाणी छापे,तर ६३ परवाने निलंबित

---Advertisement---

 

नवी दिल्ली -पश्चिम आशियातील तणावामुळे एलपीजी व तेल पुरवठ्यावर परिणाम होत असताना, केंद्र सरकारने साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभर धडक कारवाई सुरू केली आहे. १५ एप्रिल रोजी देशभरात २५०० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, २३८ एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ६३ वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) अचानक तपासणी मोहिम अधिक तीव्र केली असून, घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर सरकारने विशेष भर दिला आहे. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला असला तरी, घरगुती वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, ऑनलाइन एलपीजी बुकिंगमध्ये सुमारे ९८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.


व्यावसायिक एलपीजीसाठी उपाययोजना

व्यावसायिक एलपीजी वाटप संघर्षापूर्वीच्या पातळीच्या सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरबाबत जनजागृतीसाठी देशभरात ५६०० हून अधिक शिबिरे घेण्यात आली असून, आतापर्यंत ६९ हजारांहून अधिक सिलिंडरची विक्री झाली आहे.
१४ एप्रिल रोजी बीपीसीएलतर्फे आयोजित शिबिरांना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. २३ मार्चपासून आतापर्यंत सुमारे १५.५ लाख ५ किलो एलपीजी सिलिंडरची विक्री झाली आहे.
याशिवाय १४ मार्चपासून आतापर्यंत १.४२ लाख मेट्रिक टनांहून अधिक व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली असून, ऑटो एलपीजी विक्रीतही वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात दररोज सरासरी २८६ मेट्रिक टन इतकी ऑटो एलपीजी विक्री होत असल्याचे समोर आले आहे.


सरकारच्या या धडक कारवाईमुळे एलपीजी काळाबाजाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---