---Advertisement---
अमळनेर : पातोंडा ते सावखेडा मार्गावर रस्त्यावर साचलेल्या वाळूमुळे आणखी एक भीषण अपघात घडला. बाईकस्वारासह त्याचे संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या वाळूमुळे संबंधित दुचाकी घसरली आणि अपघात झाला. या अपघातात बाईकस्वारासह त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य जखमी झाले. विशेषतः अवघ्या चार महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात दगड घुसून गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. तसेच २ ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलेही जखमी झाली असून सर्वांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावर डंपर व ट्रॅक्टरमधून होणाऱ्या वाळू वाहतुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात वाळू रस्त्यावर सांडली जाते. चालकांकडून निष्काळजीपणे वाळू टाकून पळ काढल्याच्या तक्रारी वारंवार होत असून त्यामुळे रस्त्यावर वाळूचा थर साचत आहे.
परिणामी वाहन घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावर साचलेल्या वाळूचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा देखील केला जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होत नसून वाळू वाहतूक करणाऱ्यांना मोकळे रान मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ते सुरक्षित करावेत, वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात यापूर्वीही जड वाहनां मुळे अपघातांची मालिका सुरू आहे. रेती डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, क्रेन अपघातात ज्येष्ठाचा बळी, तसेच डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू तरीही ठोस उपाययोजना दिसत नाहीत, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.









