---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. राज्य सरकारने मध्यविक्रीची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापना 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली असताना, जिल्ह्यात या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. रात्री दहा नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्या काही व्यापाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप केला आहे.
या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे पोलिस प्रशासनाला संबंधित कायद्याची आठवण करून दिली. त्यानंतर डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत की, नियमांचे पालन करणाऱ्या दुकानदारांना विनाकारण दुकाने बंद करण्यास भाग पाडू नये. या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य सरकारने यापूर्वीच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 अंतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील हॉटेल्स, दुकाने, मॉल्स, नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि इतर आस्थापना 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. हा निर्णय विशेषतः नाईट लाईफ वाढवणे आणि व्यापार व्यवहारांना चालना देणे या उद्देशाने घेण्यात आला आहे. मात्र बार, परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर आणि मद्यविक्रीची दुकाने या नियमातून वगळण्यात आली असून त्यांच्यासाठी स्वतंत्र वेळा निश्चित आहेत.
नियमांनुसार, संबंधित आस्थापनांकडे वैध शॉप ॲक्ट परवाना असणे आवश्यक आहे. तसेच कामगारांच्या हिताचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस पगारी सुट्टी देणे, सलग 24 तास विश्रांती देणे आणि इतर सुरक्षा तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. दहा पेक्षा कमी कामगार असलेल्या परवानाधारक आस्थापनांना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 कलम 11 नुसार राज्य सरकारला विविध आस्थापनांच्या सुरू व बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचा अधिकार आहे. 19 डिसेंबर 2017 च्या अधिसूचनेत परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि मद्यविक्री दुकाने यांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. नंतर 31 जुलै 2019 रोजी नाट्यगृहे आणि सिनेमागृहे या निर्बंधित यादीतून वगळण्यात आली.
जळगावमध्ये व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अडचणी मांडल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. आता पोलीस यंत्रणेला स्पष्ट निर्देश देण्यात आल्यामुळे 24 तास व्यवसायासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









