---Advertisement---
चेतन साखरे
जळगाव : शहरात सद्यस्थितीला मोहाडी शिवारातील मनपा मालकीच्या १३ एकर जागेवरील अवैध अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. तब्बल ९ वर्ष पडीत असलेल्या जागेवर अचानक झोपड्या वसवणारे झारीतील शुक्राचार्य कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या झारीतील शुक्राचार्यांना शोधून त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मोहाडी गट नंबर ६० ही शिरसोली रस्त्यावरील १३ एकर जागा महापालिकेची आहे. तत्कालीन नगराध्यक्ष तुकाराम श्रीपत चौधरी यांनी ही जागा महापालिकेसाठी विकत घेतली होती. १९९७ ते २०११ पर्यंत या जागेवर अटलांटा कंपनीचे क्रशर होते. त्यानंतर २०१७-१८ मध्ये याठिकाणचे स्लॉटर हाऊस बंद करण्यात आले होते. नऊ वर्षापासून ही जागा पडीत होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये कोरोना काळ नियंत्रणात आल्यानंतर या जागेवर काही तुरळक झोपड्या वसल्या. त्यानंतर मात्र या जागेवर प्राइल लोकेशन म्हणून अधिकचे अवैध अतिक्रमण काही मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने वसविण्यात आल्याचा गंभीर आरोप महापौर दीपमाला काळे यांनी केला होता.
सोसायटीतील वस्ती मोकळ्या जागेवर
महापालिकेच्या १३ एकर जागेवर अतिक्रमण करणाऱ्या रहिवाशांना तांबापुरा येथे तंट्या भील सोसायटीत हक्काची जागा देण्यात आली होती. मात्र या राहत्या जागा विकून तेथील रहिवाशांनी महापालिकेच्या मोकळ्या जागेवर संसार थाटले. आता मात्र महापौर दीपमाला काळे यांनी या जागेवरील अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतल्याने रहिवाशांसह काही संघटना देखील विरोध करू लागल्या आहेत. तसेच महापालिकेला पुन्हा पर्यायी जागा देण्याची मागणी देखील या अतिक्रमणधारकांकडून केली जात आहे. एकप्रकारे प्रशासनाला वेठीस धरून शासकीय जमिनी गिळंकृत करण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा होत आहे.
मनपाच्या जागेची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा
मोहाडी गट नं. ६० ही १३ एकर जागा महापालिकेच्या मालकीची असतांना काही लोकप्रतिनीधींनी या जागेची परस्पर विक्री करून अतिक्रमण वसविल्याची धक्कादायक माहिती महापौरांजवळ उपलब्ध आहे. अशा प्रकारे महापालिकेच्या जागेची परस्पर विक्री करणाऱ्या लोकप्रतिनीधींवर प्रशासनाने गुन्हे दाखल करून त्यांना कायमचा धडा शिकवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अतिक्रमणाला समर्थन देणारे चेहरे उघड करा
सद्यस्थितीत जळगावात अतिक्रमणाने शहराला वेढा घातला आहे. प्रमुख रस्त्यांसह चौकाचौकांमध्ये हातगाडी, विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून सार्वजनिक जागा एकप्रकारे गिळंकृत करण्याचाच सपाटा लावला आहे. सर्वसामान्य नागरिक या अतिक्रमणाला कंटाळला असून त्यांना रस्त्याने चालतांना मोठी कसरतही करावी लागते. मात्र खुद्द महापालिकेच्या जागेवर अतिक्रमणाला समर्थन देणारे ‘ते’ नेते कोण? याचा शोध लागणे आवश्यक आहे. एकीकडे अतिक्रमण नको म्हणायचे आणि दुसरीकडे स्वतःच त्याला पाठींबा द्यायचा ही दुटप्पी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनीधींचे चेहरे उघड झाले पाहिजे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष
महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात शुक्रवारी महापालिकेत आयोजित बैठक पुढे ढकलण्यात आली होती. या बैठकीची तारीख, वेळ जिल्हाधिकारी ठरविणार असल्याने त्यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.









