---Advertisement---
भडगाव तालुक्यात अवैध वाळू माफियांची दहशत किती वाढली आहे, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. महसूल विभागाने कारवाई करत जप्त केलेला वाळूचा डंपर थेट तहसील कार्यालयाच्या आवारातूनच काही तासांत गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल पथकाने गिरड परिसरात छापा टाकला. यावेळी MH 15 HW 8699 क्रमांकाचा वाळूने भरलेला डंपर पकडण्यात आला. पुढील कारवाईसाठी हा डंपर भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आला.
मात्र, सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हा डंपर काही तासांतच, तेही रात्रीच्या अंधारात, कोणाच्याही लक्षात न येता पळवून नेण्यात आला. शासकीय कार्यालयाच्या संरक्षणात असलेले वाहनच गायब झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी महसूल विभागाकडून भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते, तरीही डंपर कसा आणि कुणाच्या मदतीने पळवण्यात आला, याबाबत अजूनही गूढ कायम आहे.
विशेष म्हणजे, भडगाव तहसील कार्यालयातून जप्त वाहने गायब होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही ट्रॉली व ट्रॅक्टर गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अवैध वाळू माफियांना कुणाचा आशीर्वाद आहे का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. वारंवार असे प्रकार घडूनही कठोर कारवाई का होत नाही? जप्त वाहन पळवणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल का केले जात नाहीत ? या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
भडगावमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, हा प्रश्न आता जनतेच्या मनात घर करून बसला आहे.









