---Advertisement---
चोपडा: तालुक्यातील चुचाळे शिवारात पोलिसांनी पहाटे छापा टाकून प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे बियाणे हस्तगत करण्यात आले असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चुचाळे येथील नितीन नंदलाल चौधरी यांच्या शेतात प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (२० एप्रिल) पहाटे पोलिस पथकाने छापा टाकला. या वेळी शेतात रचून ठेवलेल्या ९ गोण्या आढळून आल्या.
या कारवाईची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कृषी विभाग व बियाणे निरीक्षकांना पाचारण केले. तपासणीत ९ गोण्यांमध्ये तब्बल ४५० पाकिटे बियाण्यांची आढळून आली. या साठ्याचे एकूण वजन सुमारे २०२ किलो असल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे, जप्त केलेल्या बियाण्यांच्या पाकिटांवर उत्पादक, विक्रेता, पत्ता, बॅच क्रमांक किंवा किंमत यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती नमूद नव्हती, त्यामुळे हा साठा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी तालुका कृषी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी रामचंद्र पाटील यांनी लेखी तक्रार दिली असून, चोपडा शहर पोलिस ठाण्यात नितीन चौधरी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८(४) तसेच बियाणे कायदा १९६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणामागील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









