आमोद्यातील मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा; नाहीतर २५ एप्रिलला आंदोलन…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आमोदा गावात महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. सकल आदिवासी कोळी जमात, जळगाव जिल्हा यांच्या वतीने या संदर्भात इशारा देण्यात आला असून, २५ एप्रिल २०२६ रोजी कायदेशीर मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

फैजपुर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, काही समाजकंटकांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आमोदा गावात महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत संशयित आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही या घटनेची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आदिवासी कोळी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच, या प्रकरणात आदिवासी कोळी समाजातील काही तरुणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याबाबतही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. अशा प्रकरणांमध्ये सखोल तपास करूनच गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप केला असता तर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले नसते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यावल, कार्यकारी दंडाधिकारी तसेच फैजपूर मतदारसंघाचे आमदार यांना देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---