---Advertisement---
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील आमलाड गावात ‘पोर पकडणाऱ्या टोळी’च्या अफवेने निर्माण झालेल्या गैरसमजामुळे संतप्त जमावाने तिघा तरुणांना बेदम मारहाण करत त्यांच्या चारचाकी वाहनाला आग लावल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १७) सायंकाळी घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण
झाले होते.
आमलाड गावात मोड पुनर्वसन परिसरातील एक व्यक्ती आपल्या लहान मुलीला गाडीत बसवून घेऊन जात असताना ‘मुलं पळविणाऱ्या टोळी’च्या अफवेमुळे संशय निर्माण झाला. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी संबंधित वाहन अडवले.
गैरसमज वाढत गेल्याने संतप्त जमावाने त्या व्यक्तीसह इतर दोन जणांना बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या ताब्यातील बोलेरो वाहनालाही पेटवून देण्यात आले. नंतर संबंधित व्यक्ती ही स्वतःच्या मुलीसोबत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा प्रकार गैरसमजातून घडल्याचे समोर आले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही घटना गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद घटना आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा आणि कायदा हातात घेऊ नये.









