---Advertisement---
नवी दिल्ली : बंगळुरूतील अंतराळ स्टार्टअप कंपनी गॅलेक्सी आयचा दृष्टी नावाचा उपग्रह रविवारी कॅलिफोर्नियातून स्पेस एक्सच्या फाल्कन -९ रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला. मिशन दृष्टी हा जगातील पहिला ऑप्टोएसएआर उपग्रह आहे. हा इलेक्ट्रो-ऑप्टिकल (ईओ) आणि सिंथेटिक अॅपर्चर रडार (एसएआर) सेन्सर्सला एकाच मंचावर एकत्रित करतो, असे कंपनीने सांगितले. ईओ सेन्सर सूर्यप्रकाश आणि स्वच्छ आकाशात उच्च रिझोल्युशन प्रतिमा घेतात, तर एसएआर सेन्सर रडार पल्स वापरून सर्व हवामान आणि सर्वकालीन प्रतिमा प्रदान करतात.
उपग्रह आता यशस्वीरीत्या कक्षेत असल्याने आमचे तत्काळ लक्ष त्याचे कार्य पूर्ण करण्यावर आहे. आम्ही या टप्प्यातून पुढे जात असताना आमच्या ऑप्टोएसएआर पेलोडद्वारे सक्षम केलेल्या भिन्न डेटासेटमध्ये जगाचे लक्ष वेधले गेल्याचे आम्हाला दिसून येत आहे, असे गॅलेक्सी आयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुयश सिंह यांनी सांगितले.
हा उपग्रग पारंपरिक प्रणालींच्या दीर्घकालीन मर्यादांचे निराकरण करण्यात मदत करेल आणि विविध पर्यावरणीय परिस्थितींमध्ये अधिक विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण डेटा मिळवण्यात मदत करेल, असे कंपनीने म्हटले. या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचा दुहेरी वापर शक्य आहे. मिशन संरक्षण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सागरी देखरेख आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी याचा वापर शक्य आहे.
इस्रोच्या अलिकडील वार्षिक अहवालात नमूद केलेल्या २९ सक्रिय पृथ्वी निरीक्षक उपग्रहांसह भारताच्या व्यापक उपक्रमांनाही हा उपग्रह पूरक ठरेल, अशी अपेक्षा आहे. गॅलेक्सी आयने भारतासाठी एक मजबूत आणि सार्वभौम पृथ्वी निरीक्षण पायाभूत सुविधा विकसित करून मिशन दृष्टीला २०३० पर्यंत १० उपग्रहांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
गॅलेक्सी आयने जगातील पहिली ऑप्टोएसएआर उपग्रह मोहीम मिशन दृष्टीच्या प्रक्षेपणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. हा नाविन्य आणि राष्ट्रनिर्माणाप्रती असलेल्या युवावर्गाच्या ध्यासातील एक पुरावा असल्याचे संबोधले.









