---Advertisement---
जळगाव, दि. २२: Jalgaon District Cricket Association यांच्या वतीने आयोजित JCL T-20 स्पर्धेत उपांत्यफेरी गाठण्यासाठी संघांमध्ये चुरशीचे सामने रंगत आहेत. बुधवारी झालेल्या सामन्यांत अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स यांनी आपापले सामने जिंकत स्पर्धेत जोरदार दावेदारी कायम ठेवली.
अमळनेरचा दणदणीत विजय
अमळनेर सुहांस जायंट्सने चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सवर ६३ धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अमळनेरने २० षटकांत ८ गडी गमावून १४७ धावा केल्या. अजय पाटील (३४), मानव टिबरेवाल (३९) आणि सतीश चतुर्वेदी (२०) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात चाळीसगावचा संघ १६.३ षटकांत केवळ ८४ धावांवर बाद झाला. मोहम्मद सैफ याने भेदक गोलंदाजी करत तीन गडी बाद केले आणि तो सामनावीर ठरला.
रावेरचा थरारक पहिला विजय
रावेर रॉयल्सने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ७ धावांनी निसटता विजय मिळवला. रावेरने प्रथम फलंदाजी करत १९.२ षटकांत १३० धावा केल्या. यश नहार (३१), मोहम्मद नमीन (२७) आणि प्रज्वल राजपूत (२२) यांनी धावा केल्या. प्रत्युत्तरात पाचोरा संघ १९.३ षटकांत १२३ धावांवर थांबला. यश नहारने ३ बळी घेत सामनावीर किताब पटकावला.
चाळीसगावचा सहज विजय
२१ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने पाचोरा योद्धाजवर ६ गडी राखून विजय मिळवला. पाचोराने १०५ धावांचे लक्ष्य दिले होते, जे चाळीसगावने १३.५ षटकांत सहज पूर्ण केले. प्रशांत डोळे (३७), साहिल गायकर (२९) आणि ओम मुंडे (२४) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.
गुणतालिका स्थिती
स्पर्धेत जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग हे प्रत्येकी ६ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. अमळनेर आणि चाळीसगाव संघ ४ गुणांसह पुढील क्रमांकावर आहेत.
आजचे सामने (२३ एप्रिल)
दुपारी ३ वाजता: रावेर रॉयल्स विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स
सायंकाळी ७.३० वाजता: पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध अमळनेर सुहांस जायंट्स
स्पर्धेतील साखळी फेरी अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून, आजच्या सामन्यांनंतर क्वालीफायरची स्थिती स्पष्ट होणार आहे.









