जळगाव विमानतळ पण खरंच सुरक्षित आहे का ? आधुनिक रडार व धावपट्टी विस्ताराची गरज ?

---Advertisement---

 

जळगाव विमानतळावर आजही आधुनिक हवामान रडार, प्रगत लँडिंग सिस्टम आणि लांब धावपट्टीचा अभाव आहे. प्रतिकूल हवामानात विमान उतरताना धोका वाढतो, उड्डाणे रद्द होतात आणि प्रवाशांची गैरसोय होते. पण आता या सगळ्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. सिव्हिल एव्हिएशन कमिटी छत्रपती संभाजी नगर टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी थेट मागणी केली आहे. यात 1. कॅट-१ इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (ILS), 2. आधुनिक हवामान निरीक्षण यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचं… धावपट्टीचा ५,६०० फुटांवरून थेट १०,००० फुटांपर्यंत विस्तार करणं गरजेचं असल्याचं त्यांचं मत आहे.

दरम्यान, जळगाव विमानतळाची सध्याची धावपट्टी ५,६०० फूट लांबीची असल्याने येथे केवळ लहान क्षमतेची विमानेच उतरू शकतात. धावपट्टीचा १०,००० फूटांपर्यंत विस्तार झाल्यास मोठ्या क्षमतेची विमाने उतरू शकतील आणि जळगाव विमानतळ कायमस्वरूपी लहान विमानतळ म्हणून मर्यादित राहणार नाही. या पार्श्वभूमीवर जळगावमधील नागरिक संघटना व लोकप्रतिनिधींनी विविध सुविधांसाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास विमान सुरक्षा, प्रादेशिक विकास आणि खान्देशच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

धावपट्टी वाढली तर नेमकं काय बदलणार ?

आज जळगाव विमानतळावर केवळ लहान क्षमतेची विमाने उतरू शकतात. पण १०,००० फूट धावपट्टी झाली, तर मोठ्या क्षमतेची विमाने थेट जळगावमध्ये उतरणार…म्हणजेच जळगाव कायमचा “लहान विमानतळ” राहणार नाही.

हवामान रडार का इतकं महत्त्वाचं ?

जळगाव विमानतळावर सी-बँड डॉप्लर वेदर रडार बसवण्याची मागणीही जोर धरत आहे. १०० ते २५० किलोमीटरपर्यंत हवामानाचा अचूक अंदाज देणाऱ्या या रडारमुळे अतिवृष्टी, गारपीट, वीज पडणे, चक्रीवादळ यांचे वेळेवर इशारे मिळू शकतील. आणि याचा फायदा फक्त वैमानिकांनाच नाही… तर केळी, कापूस आणि इतर पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या खान्देशातील शेतकऱ्यांसाठीही ही सुविधा जीवनावश्यक ठरणार आहे.

मग प्रश्न असा आहे… जळगाव विमानतळ सुरक्षिततेच्या बाबतीत मागेच राहणार, की आधुनिक सुविधांसह विकासाचं नवं केंद्र बनणार? आता नागरिक, संघटना आणि लोकप्रतिनिधी पुढे येऊन पाठपुरावा करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जळगाव विमानतळाचा विकास हा फक्त विमानांचा विषय नाही, तर संपूर्ण खान्देशच्या भविष्यासाठी निर्णायक टप्पा आहे..!

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---