---Advertisement---
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड लि.सह विविध आस्थापनांमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा व उपकरणांचे पूजन करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
१४ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहाची मुख्य संकल्पना “सुरक्षित विद्यालय, सुरक्षित रुग्णालय आणि अग्नि सुरक्षेबाबत जागरूक समाज – आग प्रतिबंधासाठी एकत्र” अशी आहे. या उपक्रमाचा उद्देश शाळा व रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणांना सुरक्षित करणे तसेच आगीच्या घटनांपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.
या अंतर्गत शाळा व रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करणे तसेच नियमित मॉक ड्रिल आयोजित करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच, कंपनीतील सहकाऱ्यांना आग लागल्यानंतर घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच ‘काय करावे आणि काय टाळावे’ याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
“आग प्रतिबंध ही केवळ अग्निशमन दलाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे,” ही भावना रुजवण्यासाठी सहकाऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. १९४४ मधील मुंबई डॉकयार्ड स्फोटात शहीद झालेल्या अग्निशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सप्ताह साजरा केला जात आहे.
जैन फूड पार्क, जैन हिल्स, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क आदी ठिकाणी १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील, रोशन शहा, संजय पारस, जी. आर. पाटील, वाय. जे. पाटील, तुकाराम बुधवंत तसेच फायर सेफ्टी विभागातील सहकारी उपस्थित होते.
प्लास्टिक पार्क येथे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन यंत्रणा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जे. एस. जैन, सी. एस. नाईक, डॉ. जनमेजय नेमाडे, डॉ. योगेश बाफना, शुभम शुक्ला, अभिजीत पवार व फायरमन उपस्थित होते.









