Jalgaon Crime News : फोटो , व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार, एकास अटक

जळगाव : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अशातच जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फोटो व व्हिडीओ  व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

शहरातील आयोध्या नगर परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अयोध्या नगर परिसरातील एका भागात २२ वर्षीय तरुणीही आपल्या कुटुंबासह राहत आहे. दरम्यान १ जानेवारी २०२४ रोजी तरुणी आंघोळ करत असताना संशयित आरोपी राहुल पाटील याने नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. दरम्यान, हा अत्याचार असह्य झाल्याने तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तिने राहुल पाटील विरोधात एमआयडीसी पोलिसातून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी राहुल योगराज पाटील वय-२६, रा. आयोध्या नगर, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.