जळगाव: मास्टर कॉलनीत थार गाडीची तोडफोड; दोन तरुणांना मारहाण, पोलिसांवर दगडफेक

---Advertisement---

 

जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात रात्री उशिरा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अवैधपणे गुरांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करत काही तरुणांनी एक वाहन अडवले. यानंतर झालेल्या वादातून थार गाडीची तोडफोड करण्यात आली तसेच दोन तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनीतून गुरांची वाहतूक करणारे वाहन जात असल्याची माहिती काही स्थानिक तरुणांना मिळाली. त्यांनी संबंधित वाहन अडवून जाब विचारला. यावेळी वाहतूक करणारे आणि विरोध करणारे तरुण यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद काही वेळातच हाणामारीत परिवर्तित झाला. संतप्त झालेल्या जमावाने थार गाडीची तोडफोड केल्याचे समोर आले आहे.

या घटनेत दोन तरुण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिस कारवाई सुरू असतानाच काही संतप्त तरुणांनी पोलिसांवरही दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुरांची वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. वाहनातील गुरांना सुरक्षितपणे गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

घटनेबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले की, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि घटनेतील सर्व संबंधितांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---