---Advertisement---
जळगाव शहरात एलपीजी गॅसच्या टंचाईचा थेट परिणाम आता वाहतूक व्यवस्थेवर दिसू लागला आहे. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऑटो रिक्षा चालकांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता रिक्षा प्रवासासाठी नागरिकांना प्रतिसिट 10 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
जळगाव शहरात वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईमुळे रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याची माहिती रिक्षा चालकांकडून दिली जात आहे.
रिक्षा चालकांच्या म्हणण्यानुसार, सध्या एलपीजी गॅस सहज उपलब्ध होत नाही. अनेक ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीमुळे रिक्षा चालकांचा खर्च वाढला असून त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याचे चालकांनी सांगितले. त्यामुळे अखेर त्यांनी प्रतिसिट 10 रुपये भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, रिक्षांच्या भाडेवाढीचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. रोजच्या प्रवासासाठी रिक्षाचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला यामुळे अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे. यामुळे एकीकडे रिक्षा चालकांचा वाढलेला खर्च तर दुसरीकडे प्रवाशांवर वाढलेला आर्थिक भार अशी दुहेरी परिस्थिती जळगाव शहरात निर्माण झाली आहे.









