---Advertisement---
पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र. ऊ. परिसरात सध्या आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, १७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या आगीत दोन एकर क्षेत्रातील मका पीक आणि ठिबक सिंचन संच पूर्णपणे जळून खाक झाला असून, शेतकरी विजय त्र्यंबक पाटील यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आह
मिळालेल्या माहितीनुसार, मुंदाणे शिवारातील गट नंबर १३/७२/२/अ मध्ये विजय त्र्यंबक पाटील यांची शेती आहे. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू असताना शेतातील विद्युत डीपीवर अचानक शॉर्ट सर्किट झाले. या शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा स्फोट होऊन ठिणग्या शेतात पडल्या. वाळलेला मका आणि कडक उन्हामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. गेल्या पाच महिन्यांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेले पीक डोळ्यादेखत जळताना पाहून शेतकरी विजय पाटील यांनी शेतातच हंबरडा फोडला. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने नव्हे, तर महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे हिरावला गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मका पिकासोबतच शेतातील महागडे ठिबक संचही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनेची माहिती मिळताच मुंदाणे येथील तलाठी एम.पी. भावसार यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा रितसर पंचनामा केला. यावेळी उपसरपंच राजकुमार दगडू पाटील, नाना पाटील, गोलू पाटील, कोतवाल अशोक पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









