---Advertisement---
भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरातील सर्वे क्रमांक 115/1/अ, प्लॉट क्रमांक 09 वरील माऊली प्लाझा या वादग्रस्त इमारतीच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून पुढील कारवाईसाठी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
पाहणीदरम्यान मंजूर आराखड्यापेक्षा वेगळे आणि अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळून आले आहे. विशेषतः बेसमेंटच्या लांबी-रुंदीमध्ये बदल, इमारतीच्या उंचीत वाढ तसेच इमारतीच्या विविध बाजूंनी करण्यात आलेले एक्स्टेंशन हे मंजूर नकाश्यापेक्षा वेगळे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय इमारतीच्या परिसरालगत हाय टेन्शन वीजवाहिनी जात असल्याची बाबही अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात असून भविष्यात संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी नोंद करण्यात आली आहे. तसेच मंजूर आराखड्यातील लिफ्ट डक्ट, पार्किंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींमध्येही प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचे संयुक्त पाहणीत स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच लेखी तक्रारी केल्या होत्या. आता पाहणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर या वादग्रस्त बांधकामावर प्रशासन कोणती कठोर कारवाई करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
तसेच भुसावळ शहरातील इतर अनधिकृत बांधकामांवरही प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.









