---Advertisement---
जळगाव शहरात पावसाळ्यापूर्व स्वच्छता अभियानाला वेग देत महापौर दीपमाला काळे यांनी धाडसी पाऊल उचलले. भाऊंच्या उद्यानातील जलकुंभाची पाहणी करताना त्या थेट पाण्याच्या टाकीत उतरल्या आणि साफसफाईच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
शहराला शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने सुरू असलेल्या मोहिमेत जलकुंभांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. सुमारे १०० फूट उंच आणि २८ लाख लिटर क्षमतेच्या टाकीत निसरड्या शिडीवरून उतरून महापौरांनी कामाची गुणवत्ता तपासली. यावेळी नगरसेवक नितीन बरडे, रितिक ढेकळे तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही त्यांच्या सोबत होते.
कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशीलता
टाकीच्या आत दमछाक करणाऱ्या परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मेहनत पाहून महापौर भावूक झाल्या. त्यांनी तातडीने पिण्याचे पाणी व चहाची व्यवस्था करण्याचे आदेश देत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
पावसाळ्यापूर्व तयारीला वेग
महापौरांच्या पुढाकाराने शहरातील तीन जलकुंभांची स्वच्छता पूर्ण झाली असून, डिसेंबर महिन्यात पुन्हा अशीच मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पाहणीदरम्यान अनेक नगरसेवक व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महापौरांच्या या ‘ऑन-ग्राउंड’ कामामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढल्याची भावना व्यक्त होत असून, जळगावकरांमध्ये त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.









