---Advertisement---
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांच्याशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या प्रकरणात प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक यापूर्वीही वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. आता पुन्हा या पुस्तकाच्या शीर्षकावरून आणि मजकुरावरून हा वाद चिघळला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये आमदार गायकवाड हे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जाब विचारला असून, त्याचवेळी अश्लील शिवराळ भाषा वापरल्याचे आरोप आहेत. मात्र, या ऑडिओ क्लिपची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकेरी उल्लेख केल्याचा जाब विचारला असता समोरून चुकीची भाषा वापरली गेली. शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले.
प्रकाशक प्रशांत आंबी यांनीही गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांनी पुस्तकाच्या शीर्षकातील ‘जी’ हा आदरार्थी उल्लेख असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात कायदेशीर लढा देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या वादामुळे पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून, सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहेत
तरुण भारत लाईव्ह या प्रकरणाची पुष्टी करत नाही….!









