---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत बनावट माहितीच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात केळी पीक विम्याच्या नावाखाली सुमारे ६६ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा बोगस व्यवहार केल्याप्रकरणी ५ सीएससी केंद्रचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर रावेर तालुक्यात सुमारे ४ कोटी ७४ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ४ केंद्रचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांमुळे जिल्ह्यातील विमा प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तपासात उघड झाल्यानुसार, अनेक ठिकाणी प्रत्यक्षात केळी पीक नसतानाही विमा अर्ज भरून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलेल्या पडताळणीत शेकडो हेक्टर क्षेत्रावर पीक नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात सीएससी केंद्रचालकांनी संगनमताने बनावट कागदपत्रे वापरून, चुकीची माहिती पोर्टलवर अपलोड करून शासन आणि विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकारात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस अर्ज दाखल करून अनुदान लाटण्याचा डाव रचण्यात आला होता.
प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर संशयित केंद्रांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, विमा अर्ज प्रक्रियेत कोणतीही फसवणूक आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
दरम्यान, या घोटाळ्याच्या तपासातून आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.









