---Advertisement---
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे वैवाहिक आयुष्याला धक्का देणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चार मुलांची आई असलेली विवाहित महिला प्रियकरासोबत घरातून निघून गेल्यानंतर पुन्हा परत आली आणि नवऱ्यासमोर अजब अट ठेवल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून जीवाला धोका असल्याचा आरोप करत पतीने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ग्वालियरच्या सिकंदर कंपू भागात राहणारे राजकुमार कुशवाह यांचा 2008 मध्ये पूनम कुशवाह यांच्यासोबत हिंदू पद्धतीने विवाह झाला होता. सुरुवातीला दोघांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू होते. त्यांना चार मुलेही आहेत. मात्र, काही वर्षांनंतर पती-पत्नीमध्ये वाद वाढू लागले.२२ जानेवारी २०२६ रोजी पूनम या कोणतीही माहिती न देता घरातून निघून गेल्या. कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. त्यानंतर मार्च महिन्यात त्या अचानक घरी परतल्या. यावेळी त्यांनी आशु उर्फ कमल सेन नावाच्या युवकासोबत संबंध असल्याची कबुली दिली. गेल्या दोन महिन्यांपासून त्या त्याच्यासोबत राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याचदरम्यान, पत्नीने नवऱ्यासमोर धक्कादायक अट ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजकुमार यांच्या म्हणण्यानुसार, “जर संसार करायचा असेल तर प्रियकरालाही घरात सोबत राहू द्यावे,” अशी मागणी पूनम यांनी केली. मात्र, राजकुमार यांनी ही अट नाकारल्यानंतर घरातील वाद अधिक वाढले.
५ मे २०२६ रोजी पूनम पुन्हा घरातून बाहेर गेल्या आणि दुपारी परतल्यानंतर त्यांनी पतीला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या वादात पूनम यांनी वीट डोक्यात मारून जखमी केल्याचे राजकुमार यांनी पोलिसांना सांगितले आहे.घटनेनंतर जखमी अवस्थेत राजकुमार यांनी पोलिस ठाणे गाठत पत्नी आणि तिच्या प्रियकरापासून जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









