---Advertisement---
जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या कारागृहातील बराकीतच दोन कैद्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. या घटनेत एका कैद्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून संबंधित आरोपीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 26 मे 2026 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हा कारागृहातील बराक क्रमांक 8 मध्ये घडली. वाल्मीक नगर परिसरातील 29 वर्षीय कैदी बराकीत असताना त्याच ठिकाणी बंदिस्त असलेल्या श्याम तुकाराम सूर्यवंशी याने जुन्या वादातून त्याच्याशी भांडण सुरू केले. काही वेळातच दोघांमधील वाद वाढला आणि आरोपीने संबंधित कैद्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या तुंबळ मारहाणीदरम्यान आरोपीने पीडित कैद्याला जोरात ढकलल्याने तो बराकीच्या भिंतीवर आदळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. घटनेनंतर कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकारानंतर आरोपीने पीडित कैद्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पीडित कैद्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात श्याम तुकाराम सूर्यवंशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारागृहासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने कारागृहातील अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.









