अमळनेर : अमळनेर रेल्वे स्थानकावर आज गुरुवार १५ मे रोजी दुपारी २ वा. १६ मि. मालगाडीचे ७ डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच मदत व पुनर्बांधणी कार्याची पाहणी केली. या घटनेमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले आहे. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
खासदार स्मिता पाटील यांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, अशी सूचना रेल्वे प्रशासनाला केली आहे. अपघातग्रस्त रुळावर रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत मालगाडीचे लोको पायलट व गार्ड हे पूर्णतः सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघातात काही डब्बे रुळावरून घसरून खाली पडले. यामुळे मुख्य रेल्वे ट्रॅकसह शेजारील ट्रॅकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या अनेक प्रवासी गाड्या प्रभावित होणार असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
घटनास्थळ हे अमळनेर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावरच असल्याने रेल्वे प्रशासन, पोलीस अधिकारी व यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या वेळी खा . स्मिता वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्यात .
अमळनेर रेल्वे अपघातस्थळी खा. स्मिता वाघ यांची भेट; पाहणी करीत दिल्या सूचना
by team
Updated On: मे 15, 2025 7:32 pm

---Advertisement---
---Advertisement---