---Advertisement---
केंद्र सरकारतर्फे जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण) वर्ष २०२७ करिता पात्र मान्यवरांच्या नावांचे नामांकन/शिफारसी सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी ३१ जुलै २०२६ पर्यंत https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान केले जातात. नामांकन प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार असून, अंतिम मुदतीनंतर कोणतेही प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नामांकन करताना संबंधित व्यक्तीचे कार्य “Excellence Plus” या निकषांनुसार उच्च दर्जाचे असावे, तसेच त्या कार्यात समाजसेवेचा घटक असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित व्यक्तीस यापूर्वी राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत का, याची नोंद करणेही अपेक्षित आहे.
निवेदनानुसार, मरणोत्तर पुरस्कारासाठी साधारणतः शिफारस करता येत नाही. मात्र, अपवादात्मक प्रकरणांमध्ये जानेवारी २०२६ नंतर निधन झालेल्या व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो. त्यापूर्वी निधन झालेल्या व्यक्तींच्या शिफारसी स्वीकारल्या जाणार नाहीत.
तसेच पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांसाठी शिफारस करण्यासाठी ठरावीक कालावधीची अट लागू असून, काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये त्यात शिथिलता दिली जाऊ शकते. शासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी, तसेच सार्वजनिक उपक्रमातील डॉक्टर, शास्त्रज्ञ व इतर कर्मचारी हे पद्म पुरस्कारांसाठी पात्र नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या स्तरावर पात्र व्यक्तींच्या शिफारसी वेळेत सादर कराव्यात, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









