जळगाव : कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेला विनयभंग व दमदाटीला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक जळगाव शहरात प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाभरातील रुग्ण हे उपचारासाठी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येत असतात. या ठिकाणी कक्ष क्रमांक १२ मध्ये एरंडोल येथील संजय अनिल भोई उपचार घेत आहे. त्याला अपघात झाल्याने त्यास दाखल करण्यात आले आहे. सोमवारी ( १२ मे) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी परिचारिका ह्या आपले कर्तव्य बजावीत होत्या. यावेळी संशयित आरोपी एरंडोल येथील गोलू वंजारी याने परिचारिकेजवळ येऊन, त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत जाब विचारला असता गोलू वंजारी यानी, तुला काय करायचे ते कर असे म्हणत दमदाटी केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यास विचारणा केली. यावेळी संशयित आरोपी गोलू वंजारी याने सुरक्षारक्षकाला देखील दमदाटी करून धक्काबुक्की केलीय. यानंतर तो कक्षातून निघून गेला. याबाबतची जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला परिचारिकेने फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहेत.