---Advertisement---
जळगाव : राज्यात महिला, अल्पवयीन मुली,यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असाच एक संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात घडला आहे. यात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. हा सर्व दुर्दैवी प्रकार मंगळवारी ( १२ ऑगस्ट) रोजी रात्री सुमारे ११ वाजता घडला.
प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी अमळनेर शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रात्री संशयित अन्नू नारायण साळुंखे (पारधी, रा. अमळनेर) याने मुलीला फोन करून भेटण्यास बोलावले. त्यानंतर दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या गुन्ह्यात गण्या उर्फ गणेश नाना साळुंखे (पारधी, रा. अमळनेर) याने आरोपीस मदत केली.
घरी परतल्यानंतर मुलीने नातेवाईकांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तातडीने अमळनेर पोलीस स्टेशनला धाव घेतली. दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. या फिर्यादीवरून बुधवारी,( १३ ऑगस्ट) रोजी रात्री ८ वाजता गुन्हा नोंदवून पोलिसांनी अन्नू साळुंखे आणि गण्या साळुंखे या दोघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.