---Advertisement---
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस पथकाने अचानक छापेमारी करीत कारवाई केली असून गुटखा, देशी-विदेशी दारू, गांजा व सट्टा प्रकरणी अनेकांना मुद्देमालसह ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पिंपळगाव (हरे )येथील माळी मंगल कार्यालयाच्या पाठीमागील घरावर छापा टाकला. या कारवाईत मंगलबाई प्रदीप निकम, सिद्धांत प्रदीप निकम व अमित प्रदीप निकम यांच्या घरातून विक्रीसाठी साठवलेला सुमारे ८,१६२ रुपयांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला तसेच ६,२७० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचवेळी कालीका माता चौक परिसरात विजय आत्माराम जगताप हा इसम गांजा बाळगताना व सेवन करताना आढळून आल्याने त्याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच वरखेडी येथील अशोक भिका पाटील हा इसम देशी दारूची विक्री करताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
दरम्यान, लोहारा दुर्गक्षेत्रातील कु-हाड खु. येथे पांडुरंग फकिरा तिरमल हा इसम सट्टा खेळविताना मिळून आल्याने तसेच त्याला सट्टा लावण्यास प्रवृत्त करणारा संदीप भाउसाहेब पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) यांच्याविरुद्धही महाराष्ट्र जुगार कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोहेकॉ अभिजित निकम, किरण ब्राह्मणे, तात्याबा नागरे, शैलेश चव्हाण, पोना राहुल बेहरे, पोकॉ भारत पाटील, नामदेव इंगळे, अमोल पाटील, शाम हटकर, मपोकॉ मंजू खंदारे, चालक पोलीस नाईक दीपक अहिरे यांनी केली.









