---Advertisement---
जळगावच्या भुसावळमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भुसावळ नगरपरिषदच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
भुसावळ नगरपरिषदच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली. विशेष म्हणजे ही कागदपत्रे उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील फत्तेपूर बजेरिया येथून मिळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सध्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दावा जळगाव येथील जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या रजनी सावकारे यांनी काही कागदपत्रे सादर करून त्यांच्या दाव्यावर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.
मात्र, समितीच्या तपासणीत संबंधित कागदपत्रांमधील जमीन व मालमत्ता या गायत्री भंगाळे किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या नसल्याचा दावा नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी केला आहे. यामुळे या कागदपत्रांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तक्रारीत विशेषतः ‘कामता प्रसाद नारायण’ या नावाचा उल्लेख असून, त्या व्यक्तीचा भंगाळे कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवणूक व कटकारस्थान रचल्याचा आरोप करत संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 420 आणि 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सखोल चौकशी करून संबंधितांना अटक करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, या प्रकरणाकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









