हॉकर्सला पाच दिवसांत पर्यायी जागा द्या ! महापौर दीपमाला काळे यांचे प्रशासनाला आदेश

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे हॉकर्स बांधवांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि पर्यायी जागेचा प्रश्न यावर महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “हॉकर्सला पर्यायी जागा देण्याबाबत पुढील ५ दिवसांत ठोस निर्णय घ्या आणि अतिक्रमण काढताना कोणताही भेदभाव करू नका,” असे स्पष्ट आदेश महापौरांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.

शहरातील अनेक हॉकर्स बांधवांनी महापौर दीपमाला काळे यांची भेट घेतली. “अतिक्रमण काढताना भेदभाव केला जातोय, आम्हाला काही दिवस व्यवसाय करू द्या.” अशी मागणी हॉकर्सनी महापौरांकडे केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महापौरांनी तातडीने उपायुक्त पंकज गोसावी आणि अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांना कक्षात बोलावून घेतले. बैठकीत महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध मुद्द्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

हॉकर्ससाठी पर्यायी जागा कोठे उपलब्ध करून देता येईल, याचा तातडीने शोध घेऊन ५ दिवसांत निर्णय घ्यावा. अतिक्रमण मोहिमेत कोणाचीही गय करू नका, मात्र भेदभाव होत असल्याचे आढळल्यास संबंधित विभागावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौरांनी दिला. महापालिकेकडे २,९०० हॉकर्सची नोंदणी आहे, मात्र प्रत्यक्षात ५ ते ६ हजार लोक व्यवसाय करत आहेत. यामुळे मूळ हॉकर्सवर अन्याय होऊ नये, याची काळजी घेण्यास सांगितले.

शहरातील वाहतूक कोंडीवर चिंता

महापौरांनी यावेळी शहरातील विदारक परिस्थितीवरही बोट ठेवले. अनेक हॉकर्स रस्त्यापर्यंत दुकाने थाटतात, ज्यामुळे यांच्याकडे येणारी ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. परिणामी, जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस तोडगा काढणे आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले.

प्रशासनाची भूमिका

उपायुक्त पंकज गोसावी यांनी या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली असून, महापौरांच्या सूचनेनुसार पुढील पाच दिवसांत हॉकर्स झोन आणि पर्यायी जागेबाबत नियोजन पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---