---Advertisement---
महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटक असलेला भोंदूबाबा अशोक खरात याचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून, न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी खरातला डोकेदुखीचा त्रास होत असून, आधीच खांद्याची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. पेनकिलर औषधांनी आराम न मिळाल्याने त्याची मेंदूविकार तज्ञांकडून तपासणी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली.
यावर न्यायालयाने पोलिसांना आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सरकारी पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत एकसारखी असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन व फसवणूक करून अत्याचार केल्याचा आरोप असून, संबंधित पुरावे व कटाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे.
आतापर्यंत अनेक पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी दाखल केल्या असून, खरातविरोधात एकूण 12 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी SIT मार्फत सुरू आहे.









