---Advertisement---
मुंबई/बारामती, प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असून अहवालानंतर प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. गेल्या महिन्यातही त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेला शरद पवार उपस्थित राहू शकणार नसले, तरी सुप्रिया सुळे या सभेला हजेरी लावणार आहेत.
सुळे म्हणाल्या, “सुनेत्रा वहिनींनी कुटुंब म्हणून मला प्रचारासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. त्यामुळे कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्या सभेला जाऊन शुभेच्छा देणार आहे.”
पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत, “सध्या विलीनीकरणाचा कोणताही विषय नाही. आता राज्य व देशासमोरील प्रश्न महत्त्वाचे आहेत,” असे सांगितले.
तसेच महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकाची अंमलबजावणी लवकर व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले.









