सासऱ्यांचा आदर्श पुढाकार: विधवा सुनेचा पुनर्विवाह; शेगावातून माणुसकीचा उज्ज्वल संदेश

---Advertisement---

 

शेगाव येथे माणुसकी, समजूतदारपणा आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर आदर्श पाहायला मिळाला. सासऱ्यांनी आपल्या विधवा सुनेला लेकीप्रमाणे मान देत तिच्या पुनर्विवाहाचा घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
खामगाव परिसरातील वाटिका भागातील अन्नपूर्णा हॉटेल येथे २६ एप्रिल रोजी महानंदा गजानन खडसे (रा. वाशीम) यांचा पुनर्विवाह मंगेश मधुकर भुतेकर (व्यवसाय – इंजिनिअर) यांच्यासोबत पारंपरिक आणि धार्मिक विधींनी संपन्न झाला.
महानंदा यांचा पहिला विवाह २०२० मध्ये गजानन निंबाजी खडसे यांच्याशी झाला होता. मात्र ९ एप्रिल २०२४ रोजी गजानन यांचे अकाली निधन झाले आणि अवघ्या २६ वर्षांच्या महानंदा यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. या कठीण काळात खडसे कुटुंबीयांनी तिला कधीच एकटे सोडले नाही. सुनेऐवजी लेकीप्रमाणे जपणूक करत मानसिक आधार दिला.


दरम्यान, काही सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या व्यक्तींनी विधवा पुनर्विवाहाचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला भावनिकदृष्ट्या कठीण वाटणारा हा निर्णय सासरे निंबाजी खडसे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने स्वीकारला. त्यांनी केवळ संमती दिली नाही, तर महानंदा यांना नव्या आयुष्याची दिशा स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले.
नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या सहकार्याने योग्य स्थळ शोधण्यात आले आणि मंगेश भुतेकर यांच्याशी विवाह निश्चित करण्यात आला. मंगेश यांचाही हा दुसरा विवाह असून, दोघांनीही आयुष्यातील कठीण प्रसंगानंतर नव्याने संसार उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा मिलाप नसून समाजाला सकारात्मक दिशा देणारा आणि नात्यांची खरी किंमत अधोरेखित करणारा आदर्श ठरला आहे. सासरच्या मंडळींनी सुनेला लेकीप्रमाणे मान देत तिच्या आनंदासाठी घेतलेला निर्णय अनेक कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


खडसे कुटुंबीयांचे धैर्य कौतुकास्पद
आजही समाजात विधवा पुनर्विवाहाबाबत संकोच आणि परंपरागत विचार आढळतात. अशा परिस्थितीत खडसे कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य, समजूतदारपणा आणि सामाजिक जाणीव निश्चितच कौतुकास्पद आहे. दुःखाच्या सावटातून बाहेर पडत नव्या आशा आणि स्वप्नांसह आयुष्याला पुन्हा सामोरे जाण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---