---Advertisement---
रावेरहून पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सच्या बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना ही छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गावरील पांढरी फुल घाट परिसरात २३ एप्रिल रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एम एच १९ वाय ९५४९ क्रमांकाची ही बस सुमारे ४० प्रवासी घेऊन पुण्याकडे निघाली होती. प्रवासादरम्यान, बसच्या ब्रेक लाइनरमध्ये बिघाड झाल्याने धूर निघू लागला. पुण्याकडे जाणाऱ्या एका कार चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ बस चालकाला सूचना दिली. यावेळी चालक आणि कंडक्टर यांनी प्रसंगावधान दाखवत बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र बस दुरुस्तीसाठी सुमारे तीन तास लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी झालेल्या विलंबामुळे आर्थिक नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत ट्रॅव्हल्स व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली.









