कानळदा गावात सीईओंची धडक तपासणी; आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास कामांचा घेतला आढावा

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जळगाव तालुक्यातील कानळदा गावाला अचानक भेट देत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयाची सखोल पाहणी केली.
सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विविध विभागांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून ही अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेत विविध सेवांची गुणवत्ता तपासली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीदरम्यान रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेत, दर्जेदार व वेळेवर आरोग्य सुविधा देण्याबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. औषधसाठा, स्वच्छता, कर्मचारी उपस्थिती व रुग्णसेवा यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


यानंतर जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, पोषण आहार व सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या भेटीत सरपंच, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांशी चर्चा करत विविध योजनांचा आढावा घेतला. दप्तर, नोंदवही व प्रशासनिक कामकाजाची तपासणी करून ग्रामविकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.


या अचानक भेटीमुळे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कार्यतत्परतेचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा परिषद प्रशासन नागरिकांना अधिक सक्षम व परिणामकारक सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---