---Advertisement---
जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात ३६ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शशिकांत रमेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप मयताच्या वडिलांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी शशिकांतला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत कोळी हा गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणीसोबत शिव कॉलनी परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर तो मोहाडी रोड परिसरात स्वतंत्र राहत होता.
घटनेच्या दिवशी सकाळपासून शशिकांतचा फोन लागत नसल्याने त्याचे वडील रमेश कोळी यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मोहाडी रोड परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीत जाऊन पाहिले असता तो मृतदेह स्वतःच्या मुलाचा असल्याचे समोर येताच रमेश कोळी यांनी एकच आक्रोश केला.
शशिकांतला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयताच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणी व तिच्या साथीदारांसोबत शशिकांतचा वाद झाला होता. त्यानंतर नाशिकहून एका तरुणाला बोलावून शशिकांतला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शशिकांतच्या शरीरावर जखमांचे निशाण असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
“माझ्या मुलाला आधी मारहाण झाली होती, त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. हा अपघाती मृत्यू नाही, पोलिसांनी सखोल चौकशी करावी.” अशी प्रतिक्रिया मयताचे वडील रमेश कोळी यांनी दिली आहे.
मात्र पोलिस आणि वैद्यकीय सूत्रांकडून उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे मोहाडी रोड परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.









