---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या एका अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार मजुरांना जोरदार धडक दिली. या अपघातात चारही मजूर गंभीर जखमी झाले असून कार चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही घटना हरताळा फाटा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गालगत काही मजूर कामानिमित्त उभे असताना अचानक वेगात आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चारही मजूर रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त कारची तपासणी करताना पोलिसांना काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. कारला दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट लावण्यात आल्या होत्या. तसेच गाडीत पोलिसांच्या काठ्या सापडल्याने या प्रकरणाबाबत अधिक संशय निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून या अपघातामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.









