---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात सध्या हवामानाचा लहरीपणा वाढला असून शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसला असतानाच आता पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली असून जळगावसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण टिकून आहे. कधी थंडी तर कधी उकाडा अशी परिस्थिती जाणवत असून तापमानात सतत बदल होत आहेत. मागील दोन दिवसांत किमान तापमानात घट झाल्याने सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव जाणवतो आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ढगांची दाटी वाढेल, तर २ ते ५ फेब्रुवारीदरम्यान अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषतः दुपारी चार वाजेनंतर अचानक पावसाच्या सरी कोसळू शकतात.
काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, तर काही तालुक्यांमध्ये अल्पकालीन पण जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने उभ्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि पावसामुळे केळी, कांदा, हरभरा, गहू यासह अनेक पिकांचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुढील पाच दिवसांचा संभाव्य हवामान अंदाज :
३१ जानेवारी – किमान तापमान १८°
अंशतः ढगाळ वातावरण
१ फेब्रुवारी – किमान तापमान १७°
सकाळी धुकं, दुपारनंतर ढगाळ वातावरण
२ फेब्रुवारी – किमान तापमान १६°
ढगाळ वातावरण, दुपारनंतर पावसाची शक्यता
३ फेब्रुवारी – किमान तापमान १५°
ढगाळ वातावरण, वादळी पावसाचा अंदाज
४ फेब्रुवारी – किमान तापमान १४°
ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता
शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत, तसेच फळबागा व उभी पिके संरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.









