---Advertisement---
राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकालयाकडून एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले असून महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी तसेच अनुदानित शाळांसाठी नवीन निर्देश लागू करण्यात आले आहेत. या परिपत्रकानुसार शाळांकडून विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास सक्ती करणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, कोणतीही शाळा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना ठराविक विक्रेत्याकडूनच साहित्य खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही. असे प्रकार आढळल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच, CBSE, ICSE तसेच राज्य मंडळाशी संलग्न शाळांनी NCERT किंवा SCERTच्या मान्यताप्राप्त पुस्तकांचाच वापर करणे बंधनकारक असल्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा सक्तीने वापर टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाने सर्व प्रशासन अधिकाऱ्यांना या बाबत दक्ष राहण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे पालकांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार असून शाळांच्या मनमानीला आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









