भुसावळ शहरातील आगाखानवाडा परिसरात किरकोळ वादातून एका व्यक्तीने लोखंडी पाईप व फायटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार तैय्यब सुवामान सय्यद (वय 56, रा. आगाखानवाडा, शिवाजीनगर, नसीम मस्जिद परिसर, भुसावळ) हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासोबत पत्नी अफसाना बी, मुलगा रमजान व सुन मिसबाह राहतात.
तक्रारीनुसार, 9 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा कामावरून घरी येत असताना परिसरातील जावेद शेख उर्फ सुलेमान याने मद्यधुंद अवस्थेत त्याला रस्त्यात अडवून “या रस्त्याने जाऊ नकोस, दुसऱ्या रस्त्याने जा” असे सांगत शिवीगाळ केली. त्या वेळी वाद टाळण्यासाठी मुलगा थोडावेळ थांबून नंतर घरी गेला.
यानंतर 10 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता आरोपी जावेद शेख हा तक्रारदाराच्या घराबाहेर येऊन मुलगा रमजान याला शिवीगाळ करू लागला. यावेळी तक्रारदार बाहेर येऊन त्याला रमजान महिन्यात शिवीगाळ करू नको असे सांगितले. त्यावर आरोपी संतापून “तु जहाँ से निकला वही घुसा दूंगा” अशी धमकी देत लोखंडी पाईपने तक्रारदाराच्या डोक्यावर वार केला.
दरम्यान मुलाने आरोपीच्या हातातील पाईप हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपीने खिशातून फायटर काढून तक्रारदारावर हल्ला केला. या झटापटीत आरोपीने तक्रारदाराच्या पत्नीच्या नाकावरही फायटरने मारहाण केली तसेच मुलाचा गळा दाबल्याने त्याला दुखापत झाली. घटनेदरम्यान परिसरातील हकीम खान रहीम खान आणि सैय्यद रियाज सैय्यद उस्मान यांनी मध्यस्थी करून आरोपीला आवरले. मात्र, आरोपीने “तुमको जान से मार डालूंगा” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने आरोपी जावेद शेख हुसेन उर्फ सुलेमान याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.