---Advertisement---
पाचोरा–जळगाव राष्ट्रीय महामार्गावर बिल्दी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात घडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात पाच तरुण गंभीर जखमी झाले. असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाचोरा–जळगाव महामार्गावरील एका हॉटेलजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
झालेल्या या भीषण अपघातात श्रीरंग पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे श्रीरंग पाटील यांचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. श्रीरंग हे पाटील कुटुंबातील एकटा असल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या वडिलांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. अपघातात रोहित सोनार (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. तसेच निखिल कच्छवा (वय २५), अनिकेत कोळी (वय २२), निलेश वाघ (वय २३) सर्व रा. पिंप्राळा, जळगाव हे जखमी असून त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कारचे दरवाजे अडकल्याने रुग्णवाहिका चालकांनी कारचा पत्रा तोडून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. अपघातानंतर वाहनाला आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ही बाब लक्षात येताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत गाडीवर पाणी टाकले त्यामुळे पुन्हा संभाव्य अनर्थ टाळला.
सर्व जखमींना तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, भागवत पाटील, गोलू पाटील व किशोर लोहार यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









