---Advertisement---
वरळी परिसरात ‘महायुती’च्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीतून एक वादंग उफाळून आला. कोंडीत अडकलेल्या एका संतप्त महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माहितीनुसार, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वरळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी एका महिलेने गाडीतून उतरून “रस्ते कसे बंद करता?” असा सवाल करत संताप व्यक्त केला. संतापाच्या भरात तिने मोर्चाच्या दिशेने पाण्याची बाटली फेकल्याचाही प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “मोर्चा महिलांच्या हक्कासाठी होता. त्या महिलेचा राग आम्ही समजू शकतो; मात्र वापरलेली भाषा योग्य नव्हती. पोलिसांची परवानगी घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला होता. मी स्वतः तिला १०-१५ मिनिटांत रस्ता मोकळा होईल, असे सांगितले होते; पण त्यांनी ऐकले नाही.”
महाजन यांनी पुढे सांगितले की, आंदोलने आणि मोर्च्यांदरम्यान अशा घटना घडण्याची शक्यता असते. मात्र, भविष्यात अशा प्रकारच्या नियोजनात अधिक काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत “सामान्य नागरिकांना वेठीस धरून राजकारण केले जात आहे,” असा आरोप केला आहे.









