---Advertisement---
भुसावळ तालुक्यातील कठोरा ब्रुदूक परिसरातील तापी नदी काठी शेतीसाठी बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींची अज्ञात चोरट्यांकडून तोडफोड करून वायंडिंगच्या तारांची चोरी केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सहा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदीकाठी असलेल्या शेतांमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक मोटारी बसविल्या होत्या. दि.१७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोटारींची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या वायंडिंगच्या तारा काढून नेल्या.सकाळी शेतकरी पाणी देण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला.मोटारींचे कव्हर फोडलेले असून आतील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले.
यापूर्वीही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मोटारींची तोडफोड व तारांची चोरी झाली होती. त्या वेळी शेतकऱ्यांनी वरणगाव पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस तपास किंवा आरोपींचा मागोवा लागलेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “पोलिसांचा धाक संपला असून चोरटे निर्धास्तपणे वारंवार चोरी करत आहेत,” अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली.
या चोरीमुळे एका मोटारीमागे सुमारे नऊ हजार रुपयांचे नुकसान होत आहे. सहा मोटारींची तोडफोड झाल्याने एकूण मोठा आर्थिक फटका बसला आहे.आधीच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसताना अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.मोटर दुरुस्त होईपर्यंत पिकांना पाणी देणे कठीण होत असल्याने उभ्या पिकांवरही संकट ओढवले आहे.
या घटनेत सुभाष पाटील, राहुल वासुदेव पाटील, पिंतांबर पाटील, मधुकर दयाराम पाटील, प्रभाकर पाटील व सुभाष पाटील या शेतकऱ्यांच्या मोटारींची तोडफोड करण्यात आली आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, नदीकाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.









