---Advertisement---
गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या सोन्याच्या दरांमध्ये 2026 च्या सुरुवातीलाच मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
मल्टि कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1,80,779 रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर आता त्यात जोरदार घसरण सुरू झाली आहे.
सोमवारी (16 फेब्रुवारी) सोन्याचा दर 1,54,937 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. याचा अर्थ उच्चांकावरून तब्बल 24,500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. या अचानक पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रशियाचा ‘यू-टर्न’ ठरतोय कारण
बाजार विश्लेषकांच्या मते, रशियाने पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार सुरू करण्याच्या हालचाली केल्यामुळे सोन्याच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. याबाबत आर्थिक वृत्तसंस्था LiveMint ने अहवाल प्रसिद्ध केला आहे.
आतापर्यंत रशिया ‘डी-डॉलरायझेशन’ धोरणाचा प्रमुख समर्थक होता. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत, रशिया, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली होती. मात्र आता रशिया डॉलरकडे परत वळल्यास ही रणनीती कमकुवत होऊ शकते.
सोन्याचे दर 1 लाखांखाली जाणार?
सोने तज्ज्ञांच्या मते, भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 3000 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकते. सध्या दिसणारी किंचित सुधारणा ही केवळ ‘डेड कॅट बाऊन्स’ असू शकते, त्यानंतर पुन्हा मोठी घसरण संभवते.
सोन्याच्या दरांबाबत ब्रिक्स देशांचा प्रभाव:
जगातील सुमारे 50 टक्के सोन्याचे उत्पादन BRICS देशांकडे आहे. 2020 ते 2024 दरम्यान जागतिक सोन्याच्या खरेदीपैकी निम्म्याहून अधिक खरेदी या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी केली. मात्र रशियाने डॉलर स्वीकारल्यास सोन्याच्या साठवणीऐवजी चलन व्यवहारांना प्राधान्य मिळेल आणि त्यामुळे सोन्याच्या दरांवर मोठा दबाव येऊ शकतो.
गुंतवणूकदारांनी पुढील काही आठवडे सोन्याच्या बाजारातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.









