---Advertisement---
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर पाडा येथे आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी (देवमोगरा माता) मंदिराचे बांधकाम गेली अनेक वर्षे अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शिरपूर तालुक्यातील चिलारे ग्रामपंचायत अंतर्गत फत्तेपूर पाडा येथे असलेल्या याहा मोगी मंदिराचे बांधकाम गेल्या 11 वर्षांपासून ठप्प आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या बांधकामाला 2001 साली सुरुवात झाली होती. मात्र तब्बल 16 वर्षांच्या कालावधीत केवळ 70 टक्के काम पूर्ण होऊन 2016 पासून काम पूर्णपणे बंद पडले आहे.
या पार्श्वभूमीवर बिरसा ब्रिगेडचे धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष तथा आदिवासी युवा नेते रोहिदास पाडवी यांनी 10 एप्रिल रोजी प्रत्यक्ष स्थळी भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिराचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. हे मंदिर स्थानिक आदिवासी समाजासाठी अत्यंत श्रद्धेचे केंद्र आहे. शिरपूर विधानसभेचे आमदार काशिराम पावरा तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच मंदिराचे काम पूर्ण झाल्यास महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येऊ शकतात, ज्यामुळे स्थानिक पर्यटनालाही चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.









