---Advertisement---
सावदा : सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सावखेडा येथे शनिवारी (२१ जून) रोजी गौण खनिजांची वाहतूक करताना एका डंपराने दुचाकीला समोरुन धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली, या अपघातात दुचाकी डंपराच्या पुढच्या टायर खाली गाडीचा संपुर्णपणे त्याचा चुराडा झाला आहे.
सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.सावखेडा मार्गांवर सुसाट वेगात डंपर हे गौण खनिजांची वाहतूक करीत असतात. या वाहनांच्या सुसाट वेगाने होणारी वाहतूकीमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच हा अपघाताची घटना घडली. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी दुचाकीला धडक देणाऱ्या डंपरला अडविले.
यावेळी डंपर चालक हा दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले. यावेळी गावकऱ्यांनी रोष व्यक्त करीत डंपर चालकास मारहाण केल्याची चर्चा रंगली होती. या घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी गावकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना पोलिसांकडे मांडल्या. पोलिसांनी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत गावकऱ्यांची समजूत काढत त्यांना शांत केले.
याप्रसंगी गौण खनिजांनी भरलेले दोन डंपर पुढील कारवाईसाठी सावदा पोलीस स्टेशनला नेण्यात आले. दरम्यान, गौण खनिजांची होणारी वाहतूक ही वैध आहे की अवैध ही बाब अद्यापही स्पष्ट होऊ शकली नाही. या दृष्टिकोनातून विचार केला असता पोलीस व महसूल विभागावाकडून या संदर्भात काय कारवाईचे पावले उचलण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अपघातस्थळाजवळच असलेल्या लोहारा येथून अवैध गौण खनिज वाहतूक काही दिवसांपूर्वी होत होती. ती आता पुन्हा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. सावखेडा येथील घटनेतील ट्रक कोणाचा ? सदर गौण खनिज कोठे जात होते, याचा परवाना व ते कोणत्या ठिकाणाहुन आले याचा शोध आता पोलीस यंत्रणेने घेणे आवश्यक आहे तर महसूल विभागाने देखील याची चौकशी करणे गरजेचे आहे व तशी अपेक्षा देखील नागरिकांतून आता व्यक्त केली जात आहे