---Advertisement---
जळगाव : आमिष दाखवून पैसे लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एका प्रकरणांत जळगाव शहरातील शेअर दलाला सोबत घडला आहे. स्वस्तात सोने देतो असे सांगून या दलालाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लिंगनूर (ता. मिरज जि. सांगली ) येथे बोलावून व त्याचवेळी पोलिस आल्याच्या बहाणा करून जळगाव येथील शेअर दलालाला तब्बल २५ लाखांची फसवणूक केली आल्याचा प्रकार उघडक झाला आहे. याप्रकरणी लिंगनूर येथील लक्ष्मण नाईक या सराईत गुन्हेगारासह ७ जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---Advertisement---
जळगाव येथील शेअर दलाल यश दिलीप रडे (वय-२४, रा. लक्ष्मीनगर, जळगाव, सध्या रा. पुणे) यांना लक्ष्मण नाईक याने संपर्क साधून त्याच्याकडे स्वस्तात सोने असल्याचे सांगितले. यश रडे हे सोने खरेदीसाठी लिंगनूर येथे आल्यानंतर लक्ष्मण नाईक याने आता सोने उपलब्ध नसून सोने आल्यानंतर कळवतो, असे सांगितले. त्यानंतर मार्च महिन्यात नाईक याने सोने आले आहे. रक्कम घेऊन या, असे रडे यांना कळवले.
त्याप्रमाणे रडे २५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन आले. लिंगनूर येथे शेतात सोने दाखवत असताना तेथे पोलिसांच्या वेशात दोघेजण आल्याने सर्वजण तेथून पळून गेले. यावेळी लक्ष्मण नाईक याने सोने व रक्कम पोलीस घेऊन गेले, तुमची रक्कम परत मिळवून देतो, असे सांगून रडे यांना गावी परत पाठवले. रक्कम परत मिळण्यासाठी रडे यांनी महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर नाईक हा टाळाटाळ करू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर याबाबत यश रडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी लक्ष्मण नाईक याच्यासह सात जणांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण नाईक हा कर्नाटकातील बनावट नोटा प्रकरणातील आरोपी असून, यापूर्वी त्याच्यावर चोरी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.