---Advertisement---
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक मोठी दुर्घटना टळली. टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमानांचे पंख्यांचे टोक (Wingtip) एकमेकांना घासल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एअर इंडियाचे AI2732 हे विमान मुंबईहून कोईंबतूरकडे रवाना होण्याच्या तयारीत टॅक्सीवेवर उभे होते. त्याच वेळी हैदराबादहून मुंबईत दाखल झालेले इंडिगोचे 6E 791 हे विमान लँडिंगनंतर टॅक्सिंग करत असताना दोन्ही विमानांच्या पंख्यांचा परस्पर संपर्क झाला. आणि यात दोघा विमानांचे पंख्यांचे टोक एकमेकांना घासले गेले. या घटनेत एअर इंडियाच्या विमानाच्या पंख्याच्या टोकाला किरकोळ नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विमान तात्काळ ग्राउंड करण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून, त्यांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
त्यानंतर इंडिगो विमान कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगनंतर टॅक्सींगदरम्यान ही घटना घडली. सर्व प्रवासी सुरक्षित असून, विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. या घटनेची माहिती तात्काळ नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाला देण्यात आली असून, नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. दोन्ही विमानांची सखोल तांत्रिक तपासणी केली जात आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दोन्ही कंपन्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे विमानतळावरील टॅक्सिंग व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, चौकशीनंतर अधिकृत निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे.









